जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात रविवारी रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. जुन्या वादातून झालेल्या या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या (रा. जळगाव) याचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा संशयित आकाश सपकाळे उर्फ डोया हा घटनेनंतर पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हद्दपार आरोपी आकाश सपकाळे व सागर सपकाळे यांच्यात जुना वाद सुरू होता. रविवारी आकाश सपकाळे हा कांचन नगर परिसरात आला असता, संध्याकाळपासून दोन्ही गटांमध्ये तणावाचे वातावरण होते. रात्री साडेदहाच्या सुमारास वाद तीव्र होताच आकाश सपकाळे याने सागर सपकाळे यांच्या घरासमोर येऊन गोळीबार केला.
या गोळीबारात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला, तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला तर आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली. सर्वांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आकाश बाविस्कर याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलापूरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.



