जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील पिलखेडे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गावातील शुभम प्रभुदास भालेराव (वय २४) हा तरुण गिरणा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला. ही घटना रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. शुभम आपल्या कुटुंबातील तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. एका महिन्यानंतर होणाऱ्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीचे वातावरण असतानाच या घटनेने घरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास शुभम आपल्या काही मित्रांसह पिलखेडे शिवारातील गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो मुख्य प्रवाहात अडकून वाहून गेला. ही बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पिलखेडेपासून ते रामेश्वरपर्यंत रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र शुभमचा शोध लागला नाही.
अखेर, रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास पिलखेडे येथील नदीपात्रात शुभमचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. शुभमच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ गमावल्याने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



