रावेर : प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थिर सर्वेक्षण पथकाने गुरुवारी दुपारी ३.३० वाजता सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनातून २ लाख ५६ हजार रुपयांची अवैध रोकड जप्त केली. जिल्ह्यातील ही निवडणूक अनुषंगाने झालेली पहिलीच मोठी कारवाई ठरली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बन्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून गुरुवारी नियमित तपासणी सुरू होती. भुसावळ येथून बन्हाणपूरकडे जाणारे चारचाकी वाहन (एमएच-१९/सीएफ-२३८५) तपासणीसाठी थांबवण्यात आले. वाहनधारक कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांच्या ताब्यात २.५६ लाख रुपये आढळले. ते ही रक्कम सोयाबीन खरेदीसाठी ब-हाणपूर येथील व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, खरेदीसंबंधी कोणतेही पुरावे किंवा अधिकृत कागदपत्रे त्यांनी सादर करू शकले नाहीत.
त्यामुळे पथकाने नियमांनुसार पंचनामा करून रक्कम जप्त केली. ही कारवाई सर्वेक्षण पथक प्रमुख तथा सहकार अधिकारी डी. व्ही. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकों तथागत सपकाळे आणि कॅमेरामन समीर तडवी यांनी केली. पंचनामा पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके यांनी रोकड सीलबंद करून जिल्हा कोषागारात जमा करण्यासाठी रवाना केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अशा तपासण्या अधिक कडक करण्यात आल्या आहेत.



