Home » जळगाव » भुसावळ » भुसावळातील आठ उपद्रवींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव !

भुसावळातील आठ उपद्रवींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव !

भुसावळ : प्रतिनिधी

नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ पोलिस प्रशासनाने सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यांकडून आठ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी दिली.

या प्रस्तावांमध्ये वारंवार गुन्हे करणारे, परिसरात दहशत निर्माण करणारे तसेच निवडणुकीदरम्यान वातावरण बिघडविण्याची शक्यता असलेले गुन्हेगार समाविष्ट आहेत. संबंधितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी संवेदनशील भागांत नाकाबंदी, गस्त वाढविणे, वाहन तपासणी आणि संशयितांवर लक्ष ठेवणे या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

हद्दपारीच्या कारवाई व्यतिरिक्त फरार आरोपी, हिस्ट्रीशीटर आणि मोक्का गुन्हेगारांवरही पोलिसांची विशेष नजर आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून, संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याचे नियोजन सुरू आहे. भुसावळ पोलिस दल निवडणुकीचा काळ शांततेत पार पडावा यासाठी सज्ज असून, ‘कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *