जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कडगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी होऊन रोख २२ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव येथील किरण मोतीराम पाटील (६३) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, सहा हजार रुपये किमतीची सोनपोत, रोख सात हजार रुपये चोरून नेले. याच रात्री गावातीलच विशाल रामदास कोल्हे यांच्या घरातून १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल व रोख १५ हजार रुपये चोरून नेले. किरण पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ रोजीच्याच रात्री कडगाव येथील सुधाकर रामदास पाटील व रवींद्र श्रीधर पाटील यांच्या बंद घरात मात्र चोरीचा प्रयत्न फसला.
चोरट्यांनी किरण पाटील यांच्या घरात चोरी करताना कपाटातील २६ हजाराचे दागिने व रोख सात हजार रुपये चोरले. मात्र त्याच कपाटात असलेले जवळपास १३ तोळे सोने चोरट्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. घरफोडी झाल्याने सुरुवातीला सर्व दागिने गेल्याचे सर्वांनाच वाटले. मात्र नंतर कपाटात पाहिले असता १३ तोळ्याचे दागिने तेथेच असल्याचे आढळले व पाटील कुटुंबास काहीसा दिलासा मिळाला



