Home » ताज्या » जळगावात खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार : २१ वर्षीय युवकाचा मृत्यू, पोलिसांना न कळवता मृतदेह थेट सरकारी रुग्णालयात !

जळगावात खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार : २१ वर्षीय युवकाचा मृत्यू, पोलिसांना न कळवता मृतदेह थेट सरकारी रुग्णालयात !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, या गंभीर घटनेची कायदेशीर प्रक्रिया न पाळता रुग्णालय प्रशासनाने थेट मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून शासकीय रुग्णालयात पाठवून दिल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयाने पोलिसांना कळविणे आवश्यक होते. परंतु नियमांनुसार कळविण्याऐवजी रुग्णालयाने कोणतीही नोंद न करता मृतदेह सरकारी रुग्णालयात पोहोचवला. यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थिती संशयास्पद वाटल्याने संबंधित पोलिस स्थानकाशी संपर्क साधून या मृत्यूची नोंद आहे का, अशी विचारणा केली.

या चौकशीनंतर सरकारी डॉक्टरांनी नातेवाईकांना स्पष्ट केले की, खाजगी रुग्णालयाने मृत्यूबाबत पोलिसांना लेखी माहिती देणे बंधनकारक आहे. डॉक्टरांच्या सूचनेनंतर नातेवाईकांनी खाजगी रुग्णालय प्रशासनाला प्रश्न विचारला असता त्यांच्या गोटात खळबळ उडाली. अखेर गोंधळ उडाल्याने संबंधित रुग्णालयाने पोलिस स्थानकाला उशिराने माहिती दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे जळगाव शहरातील काही खाजगी रुग्णालयांच्या निष्काळजी आणि कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्ण सुरक्षेसारख्या संवेदनशील बाबीकडे करण्यात येणाऱ्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत असून, आरोग्य विभागाने अशी रुग्णालये तपासून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

पुढील भागात सविस्तर वृत्त…. 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *