मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भांडूप येथे जाऊन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने राऊत सार्वजनिक जीवनापासून दूर राहात होते. मात्र आजच्या भेटीत त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पाहून ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विनोदी शैलीत सांगितले की, “आता संजयला रोज फोन करण्याऐवजी त्यांच्या भावालाच त्रास देतो.” त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय मैदानात परततील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. “संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या लढाऊ बाण्याची प्रशंसा केली. 31 ऑक्टोबरपासून गंभीर प्रकृती समस्येमुळे संजय राऊत यांनी सर्व राजकीय कार्यक्रमांना विश्रांती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तरीही 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले होते. आज झालेल्या या भेटीने शिवसेना-ठाकरे गटात उत्साह निर्माण झाला असून, राऊत यांच्या लवकर होणाऱ्या पुनरागमनावर पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.



