Home » जळगाव » जळगावात चार शाळांना टार्गेट करत लाखोंची रोकड लांबविली : चोरीत तरुणीचा सहभाग !

जळगावात चार शाळांना टार्गेट करत लाखोंची रोकड लांबविली : चोरीत तरुणीचा सहभाग !

जळगाव : प्रतिनिधी

सावखेडा शिवारातील एकूण चार शाळांना टार्गेट करून, चोरट्यांनी १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरी झाली असून, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून या चोरीत तरुण मुलींचा सहभाग दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक आशिष चंद्रकांत अजमेरा (वय ५३, रा. हरेश्वर नगर) यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची १ लाख ३५ हजारांची रोख रक्कम लांबविली. ज्या चार शाळांमध्ये या चोरीच्या घटना घडल्या आहेत, त्या चारही शाळा मुख्य शहरापासून लांब आहेत. त्यातच हा परिसर संपूर्णपणे शेतशिवाराचा असल्याने, सार्यकाळनंतर या भागात वर्दळ जवळ-जवळ बंदच असते, चोरट्यांनी ही संधी साधत या शाळांमधून चोरी केली आहे. गेल्या महिन्यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातूनदेखील ११ लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२५ वाजता अजमेरा शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांना मुख्य आणि दुसऱ्या ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना विचारपूस केल्यानंतर थेट अॅडमिन रूममध्ये धाव घेतली. तिथे कपाटाचे आणि स्टिल पेटीचे कुलूप तोडून आतील संपूर्ण रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

या चोरीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज जळगाव तालुका पोलिसांच्या हाती लागले आहेत. वर्धमान शाळेच्या फुटेजमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेल्या काही युवती संशयास्पद हालचाल करताना दिसून येत आहेत. गुरुकुल किड्स शाळेच्या फुटेजमध्येही मास्क आणि स्कार्फ बांधलेल्या युवती व एक युवक दिसून आले. यामुळे या चोरीच्या घटनांमध्ये तरुणांच्या आणि महिलांच्या टोळीचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *