मुंबई : वृत्तसंस्था
भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. धस यांच्यावर तब्बल 1000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप असल्याचा दाखला देत सरोदे यांनी हा इशारा दिला. त्यांच्या विधानामुळे बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप आणि देवस्थानांच्या जमिनींबाबत सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे.

सरोदे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “राम खाडे यांनी सुरेश धस यांच्या 1000 कोटींच्या जमीन हडप प्रकरणाचे धाडसीपणे भांडाफोड केली होती. मी त्यांना पूर्वीच सावधानतेचा सल्ला दिला होता. त्यानंतरच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्याच पार्श्वभूमीवर आता माझ्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.”
राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनीही धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी खासगी मालमत्तेसारख्या वळवून घेतल्या गेल्या, त्यावर प्लॉट पाडून विक्री करण्यात आली, असा आरोप सरोदे यांनी केला. “हे सर्व बीडमधील प्रकरण असून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट संकेत राम खाडे यांनी माहिती अधिकारातून उघड केले होते,” असे त्यांनी नमूद केले.
या संदर्भात राम खाडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तक्रार स्वीकारण्यात आली नाही, असा आरोपही सरोदे यांनी केला. त्यानंतर खाडे यांच्या मार्फत मुंबई येथील ईडी कार्यालयात 200–300 कागदपत्रांसह तक्रार सादर करण्यात आली होती. “या कागदपत्रांमध्ये 1000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे मजबूत पुरावे आहेत. त्यामुळेच माझ्याही जीवाला धोका असल्याची मला जाणीव होत आहे,” असे सरोदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या आरोपांबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांच्या प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध नाहीत.



