Home » जळगाव » चाळीसगाव » चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटले !

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटले !

 

चाळीसगाव : प्रतिनिधी

कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील हतनूर येथील मंगेश बंडू आल्हाट हा २८ रोजी रात्री निवृत्ती भडंग व विशाल केवट या दोन्ही मित्रांसोबत दुचाकीने चाळीसगाव येथील मित्राला भेटण्यासाठी कन्नड येथून येत होता. दरम्यान, कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतरून चाळीसगावकडे जात असताना महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल अभिनंदनसमोरून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळीच समोरूनच्या दिशेने एक रिक्षा येवून थांबली. त्यातून तीन अनोळखी लोक उतरले. तर मंगेश आल्हाटसह त्याच्या मित्रांना त्यांनी एवढ्या रात्री काय करत आहेत, असे दटावत दुचाकीवरील तिघांना पकडले. त्यावेळी आल्हाटचा मित्र विशाल हा भीतीपाषयी पळून गेला. रिक्षातील तिघांपैकी अंगात निळ्या रंगाच्या जॅकेट घातलेल्या एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे काढून द्या, असे सांगत मंगेश आल्हाट यास धक्काबुक्की केली. पैसे देत नसल्याने त्याने आल्हाटच्या डाव्या दंडावर मारून जखमी केले. तर त्याच्या पँटच्या खिशातून ६ हजार ४०० रूपये काढून घेतले. तर सोबत असलेल्या निवृत्ती भडंग यालाही पांढऱ्या व लाल रंगाचे हाप जॅकेट घातलेल्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातून १० हजाराचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचवेळी मंगेश आल्हाट व त्याच्या मित्राने आरडओरड केली असता तिघांनी पळ काढला. याप्रकरणी मंगेश आल्हाट याच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी मुलांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी स.पो.नि. नितीन पाटील यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली. तपास पो.उ.नि. प्रदीप शेवाळे करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *