जळगाव : प्रतिनिधी
मुलीकडे गेलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरफोडी करत ६३ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा येथे उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सुतारवाडा, पिंप्राळा येथे राहणाऱ्या प्रमिलाबाई साहेबराव चौधरी या दि. १७ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथे मुलीकडे गेल्या होत्या. दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या तुळसाबाई पाटील यांनी फोनवरून घराचा कडीकोयंडा तुटलेला असून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रमिलाबाई तात्काळ सोनगिर येथून जळगावकडे रवाना झाल्या. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहणी केली असता घराचा कडीकोयंडा तुटलेला, कुलूप बाजूला फेकलेले तर हॉल व बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. स्वयंपाकघरातील लोखंडी पेटीचा कडीकोयंडा तोडून त्यामधील दागिने व रोकड चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसून आले.
घरातून ८ ग्रॅम सोन्याचे टोंगल, ६ ग्रॅमच्या साखळ्या, १ ग्रॅम वजनाच्या ४ अंगठ्या, ५० भार वजनाच्या चांदीच्या पाटल्या, ४० भार वजनाचे चांदीचे गोट असा एकूण ६३ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. प्रमिलाबाई चौधरी यांनी तत्काळ रामानंद नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहेत.



