Home » जळगाव » उच्च दाबाच्या तारांचा बळी : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, भाची गंभीर

उच्च दाबाच्या तारांचा बळी : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, भाची गंभीर

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मास्टर कॉलनी परिसरात आज  शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या गच्चीवर कपडे टांगत असताना उच्चदाबाच्या विद्युत तारेला झालेल्या स्पर्शामुळे बाप–लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली.

सविस्तर वृत्त असे कि, मास्टर कॉलनीत मौलाना साबीर खान नवाझ खान (38) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. सकाळी सुमारास मौलाना यांची भाची मारिया फतेमाबी (16) ही घराच्या गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली असता जवळून जाणाऱ्या हायटेंशन विद्युत तारेला तिचा स्पर्श झाला. अचानक बसलेल्या धक्क्याने ती खाली कोसळताच तिच्या मदतीसाठी मौलानांची मुलगी आलिया (12) पुढे धावली; परंतु तिलाही जोरदार धक्का बसला.

दोघींना विजेचा शॉक बसलेला पाहून मौलाना साबीर खान यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनाही हायव्होल्टेजचा जबर धक्का बसला. या भीषण घटनेत मौलाना साबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला. मारिया फतेमाबी गंभीर जखमी असून तिला तत्काळ सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या उपचाराला सुरुवात झाली आहे.

या दुर्घटनेत मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा थोडक्यात बचावला. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून घराजवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या तारांविषयी तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मास्टर कॉलनीमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या त्वरित हटवाव्यात, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *