धरणगाव : प्रतिनिधी
अयोध्या दर्शनावरून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अयोध्या-प्रयागराज महामार्गावरील सुलतानपूरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई पाटील यांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 भाविक जखमी झाले आहेत.

धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील सुमारे तीस महिला व पाच पुरुष असा भाविकांचा ग्रुप अयोध्येसह परिसरातील तीर्थदर्शनासाठी गेला होता. त्यांच्यासोबत जळगाव येथील काही भाविक देखील होते. सर्व भाविक रेल्वेने काशी येथे पोहोचले आणि नंतर पुढील प्रवासासाठी त्यांनी वाहनाचा वापर केला. याच दरम्यान अयोध्या तीर्थक्षेत्राजवळील सुलतानपूर परिसरात त्यांच्या वाहनाला अचानक भीषण अपघात झाला. यात छोटीबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तीस भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुलतानपूर प्रशासनाशी तातडीने संपर्क साधला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक मदतकार्य सुनिश्चित केले. मृत महिलेचे पार्थिव आणि सर्व जखमी प्रवाशांना गावी नेण्यासाठी संबंधित प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी कळवले आहे.



