जळगाव : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरातून एका गॅरेज मेकॅनिकला अटक करून चार दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उकलला आहे. आरोपी माजिदअली लियाकतअली (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याला शनिवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, माजिदअली हा गॅरेज मेकॅनिक असून, मोटारसायकल दुरुस्तीचे ज्ञानाचा गैरवापर करून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करत होता. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकासह सापळा रचून आरोपीला पकडले.
चौकशीत त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यात ४ एप्रिल रोजी धुळे सायकल मार्टजवळून (मुद्देमाल: MH 19 DK 1176), तसेच २३ आणि २९ नोव्हेंबर रोजी GMC परिसरातून दोन मोटारसायकली चोरी केल्याचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चारपैकी तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
आरोपीला पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



