अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगर येथील चेतन उर्फ सत्तू किरण धोबी (वय २०) याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत.

चेतन धोबी याच्याविरुद्ध पैसे लुटणे, मोबाईल हिसकावणे, शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे, गावठी पिस्तूल बाळगणे तसेच दुचाकी चोरी असे एकूण चार गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी हालचालींमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चेतनला जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. नोटीस देऊन दोन्ही बाजूंची सुनावणी केल्यानंतर, सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा अभ्यास करून मयूर भंगाळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश दिले आहेत.
आदेशाच्या तारखेपासून दोन दिवसांच्या आत चेतन धोबीला जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जावे लागणार आहे.



