जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौकात दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत एका २८ वर्षीय महिलेने भररस्त्यावर आरडाओरड करीत गोंधळ घालण्याची घटना घडली. यादरम्यान तिने वाहने अडवून काही दुचाकींची तोडफोडदेखील केली. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेवर कारवाई केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेली सदर महिला कुठून तरी मद्यपान करून आदित्य चौकात आली. ती रस्त्याच्या मध्यभागी उभी राहत सतत आरडाओरड करू लागली. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता तिने काही दुचाकींची तोडफोड केली.
मद्यधुंद अवस्थेमुळे महिलेचा तोल वारंवार जायचा व ती रस्त्यावर कोसळून पुन्हा उठून गोंधळ घालत होती. परिस्थिती गंभीर होताच नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता महिलेची नशा अत्यंत जास्त असल्याचे दिसून आले. पोलिसांनी व नागरिकांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.
अखेरीस पोलिसांनी तिला नियंत्रणात घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिने मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोकॉ रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली असून महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.



