भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील ४२ वर्षीय अंकुश रमेश विसपूते हे गावाला जात असल्याचे सांगून ८ जानेवारी रोजी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद रविवारी, १९ जानेवारी रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा बुद्रुक येथील अंकुश विसपूते हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. ८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता ते ‘भुसावळला जाऊन येतो’ असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी अंकुश यांचा परिसरात आणि इतर ठिकाणी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, ११ दिवसांनंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



