भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर लुटमारीचा प्रयत्न करताना झालेल्या गोळीबारात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खळवाडी पुलाच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले. त्यांनी टपरीवर गोंधळ घालत रोख रक्कम हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी टपरी चालक उल्हास पाटील यांनी विरोध करत त्यांना हटकले. त्याच क्षणी चौघांपैकी एकाने अचानक बंदूक काढून पाटील यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या उजव्या खांद्याला लागली.
गोळीबारानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी पाटील यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



