Home » राजकारण » मुंबई–नागपूर न्यायालयांना बॉम्ब धमकी, राज्यभर खळबळ

मुंबई–नागपूर न्यायालयांना बॉम्ब धमकी, राज्यभर खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवार, १८ डिसेंबर रोजी देण्यात आली. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिस व सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये “मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देण्यात येतील” असा मजकूर असून त्यात विशेषतः वांद्रे आणि किल्ला कोर्टाचाही उल्लेख करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दुपारी एकच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. वांद्रे न्यायालयातही कामकाज स्थगित करून वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

याच दरम्यान अंधेरी न्यायालयातही बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. सर्व न्यायालय परिसरांना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथकाकडून कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही आत-बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मुंबईप्रमाणेच नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, सिव्हिल लाईन्स परिसरातील न्यायालयाच्या इमारतीत दोन आरडीएक्स (RDX) आधारित स्फोटके पेरल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून तपासणी मोहीम हाती घेतली. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. दरम्यान, या धमकीमागे कोण आहे, ई-मेल कुठून पाठवण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून राज्यभरातील न्यायालयांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *