जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली गावाजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, संजय सोनवणे हे आपल्या कुटुंबासह शहरातील गेंदालाल मिल परिसरात वास्तव्यास होते. ते मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहतूक करण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते इतर मजुरांसह ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ बीजी ६०७८) द्वारे सिमेंटच्या गोण्या घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. सिमेंट खाली करून जळगावकडे परत येत असताना समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



