मुक्ताईनगर : वृत्तसंस्था
भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून, शिवसेना (शिंदे गट) कडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील या विजयाच्या मार्गावर आहेत. सध्याच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये संजना पाटील यांनी तब्बल २,५८३ मतांची आघाडी घेतली आहे.

या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र मतमोजणी जसजशी पुढे सरकत गेली, तसतशी संजना पाटील यांची आघाडी अधिक भक्कम होत गेल्याचे चित्र आहे. शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि स्थानिक पातळीवरील नियोजनबद्ध प्रचाराचा फायदा संजना पाटील यांना झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे भाजपकडून ही जागा प्रतिष्ठेची मानली जात होती. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतः लक्ष घातले असतानाही अपेक्षित यश मिळू शकले नसल्याने खडसे कुटुंबासाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे.
या निकालामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, शिवसेना (शिंदे गट) ने भाजपच्या गडाला सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, संजना पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.



