जळगाव : प्रतिनिधी
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक बसून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २१ डिसेंबर) सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोठारी नगर परिसरात वास्तव्यास असलेले संजय काळे हे नेहमीप्रमाणे रविवार सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. सकाळच्या सुमारास आशाबाबा नगरसमोरील टॉवरजवळील खांबा क्रमांक ४१६/२४ दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांना धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित पाटील व निलेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अश्विन देवचे यांनी तपासणी करून काळे यांना मृत घोषित केले.
मयत संजय काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



