मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या अडचणीत अडकले होते आता शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसद्वारे जारी केले आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



