Home » जळगाव » हॉटेलसमोर बांधलेली गाय कारमध्ये कोंबून चोरली; थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद

हॉटेलसमोर बांधलेली गाय कारमध्ये कोंबून चोरली; थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील खोटे नगर परिसरात हॉटेलसमोर बांधलेली गाय अज्ञात चोरट्यांनी कारमध्ये कोंबून चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवार दि. २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असूनही, तब्बल २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागा लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर भागातील ‘गावकरी हॉटेल’च्या समोर हॉटेल मालकाची गाय बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून दोन अज्ञात इसम घटनास्थळी आले. त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत काही क्षणांतच कारच्या मागील डिक्कीत कोंबले आणि गाडी घेऊन तिथून पसार झाले.

हा संपूर्ण थरारक प्रकार हॉटेल परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये दोन चोरटे तसेच चोरीसाठी वापरलेली कार स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर हॉटेल मालकाने तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार नोंदवूनही तपासाची गती मंद असल्याचा आरोप होत असून, याबाबत स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी सातत्याने होत असताना अशा धाडसी चोऱ्यांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीला गेलेली गाय तातडीने शोधून काढावी व चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी हॉटेल मालक व परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *