Home » जळगाव » जळगाव मनपा निवडणुकीचा बिगुल; उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात !

जळगाव मनपा निवडणुकीचा बिगुल; उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, इच्छुक उमेदवारांना आजपासून ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इच्छुक उमेदवार आणि पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत.

अर्ज प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षांच्या कार्यालयांमध्ये हालचालींना वेग आला असून, युती-आघाडी आणि जागावाटपाच्या चर्चांमुळे उमेदवारीवरून अद्याप संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *