Home » महाराष्ट्र » महापालिका रणधुमाळी : अरे बापरे.. पहिल्याच दिवशी ७७७ अर्जांची विक्री

महापालिका रणधुमाळी : अरे बापरे.. पहिल्याच दिवशी ७७७ अर्जांची विक्री

जळगाव – प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून सकाळपासूनच महापालिकेच्या इमारतीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. नामनिर्देशन अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी सहा निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रभागनिहाय तब्बल ७७७ अर्जांची विक्री झाली.

निवडणुक प्रक्रियेला मंगळवारी (दि. २३) सुरुवात झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी दहा वाजताच अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या इमारतीसमोर दाखल झाले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत गर्दी वाढली. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला.

महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह इमारतीतील दुसऱ्या व अकराव्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरही मोठी गर्दी दिसून आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना नियमानुसार आत प्रवेश देत शिस्त राखली. दरम्यान, अनेक उमेदवारांची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी विविध विभागांत धावपळ सुरू होती. पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज घेण्यात आल्याने आगामी काही दिवसांत नामनिर्देशन प्रक्रियेत आणखी गती येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उमेदवारांची चढाओढ किती तीव्र आहे, याचे स्पष्ट चित्र या आकड्यांतून दिसून येते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *