चाळीसगाव : प्रतिनिधी
रेल्वे स्टेशन परिसरात एकावर गोळीबार केल्याप्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या दोघांनी ज्यांच्याकडून हे गावठी कट्टे घेतले त्याच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला असता घरात १ गावठी कट्टा व २ राऊंड मिळून आले.

दोन घटनात पोलिसांनी ३ गावठी कट्टे (पिस्तुल) व ६ जिवंत राऊंड आणि ४ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन भागात दि. १९ रोजी गोळीबार झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी दीपक सुभाष मरसाळे (सुवर्णाताई नगर) व अतुल गोकूळ कसबे (इंदिरा नगर, बस स्थानकमागे, चाळीसगाव) यांना पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व पोकों. गोपाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून धुळे रोड परिसरातून अटक केली. त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी लक्ष्मण प्रथमेश भामरे व अमीर शेख शमशोद्दीन शेख (चाळीसगाव) यांच्याकडून गावठी कट्टे घेतल्याचे सांगितले.
या माहितीवरून चाळीसगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता प्रथमेश भामरे याच्या घरातून १ गावठी कट्टा व २ जिवंत राऊंड मिळून आले. त्याचे विरोधात पोकॉ. मोहन सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या वतीने २०२६ हे चाळीसगाव शहर सुरक्षित शहर ही संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या संकल्पनेच्या आधारे नागरीकांमध्ये सुरक्षाकामी जनजागृती केली जात आहे.



