जळगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत महायुतीचा निर्णय घेतला आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत या युतीची रूपरेषा आखण्यात आली. बैठकीला पालकमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, भाजपचे शहराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे, नितीन लढढा आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीत महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला. जागा वाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी भाजप ५५ जागांवर उमेदवार देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटासोबत जागावाटपाची चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर महायुतीतील प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार याचा अंतिम निर्णय होणार आहे.
भाजप-शिंदे सेना युतीमुळे महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या युतीमुळे विरोधकांपुढे आव्हान उभे राहणार असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.



