Home » राष्ट्रीय » “रोज नई सुबह है… माझं पोट खूप मोठं आहे” : जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया !

“रोज नई सुबह है… माझं पोट खूप मोठं आहे” : जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया !

पुणे : वृत्तसंस्था 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पुण्यात मोठा धक्का देणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या एका विधानाने चर्चेला वेग आला आहे. “प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा. रोज नई सुबह है… माझं पोट खूप मोठं आहे,” असे म्हणत सुळेंनी केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर पक्षातील नाराजी, बंडखोरी आणि संभाव्य युतीवर अप्रत्यक्ष पण ठोस संदेश दिला आहे.

मंगळवारी पुण्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः हा निर्णय जाहीर केला. जवळपास २७ वर्षांची सामाजिक-राजकीय कारकीर्द असलेल्या जगताप यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या निर्णयामागील भूमिका मांडली.

“पद किंवा सत्तेसाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी राजकारणात आलो. आजही माझी वैचारिक भूमिका बदललेली नाही,” असे सांगत त्यांनी पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधींसाठी आभार मानले. यापुढेही सामाजिक आणि राजकीय जीवनात पुरोगामी विचारांसाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा हा कोणत्याही क्षणिक भावनेतून घेतलेला नसून, तो पूर्णपणे विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत प्रतिक्रिया दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “प्रशांत जगताप यांना माझ्या शुभेच्छा. रोज नई सुबह है.” याच वेळी “माझं पोट खूप मोठं आहे,” असे विधान करत त्यांनी पक्षातील मतभेदांबाबत सहिष्णू भूमिका अधोरेखित केली.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत आणि आगामी महापालिका निवडणुकांतील जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव आलेला नाही. “प्रस्ताव आला की माध्यमांना बोलावून सविस्तर माहिती दिली जाईल. सध्या किती जागा ठरल्या आहेत, याची माहिती माझ्याकडे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर विशाल तांबे, अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यादी तयार करून ती शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर करतील, असेही त्यांनी सांगितले.

“शरद पवार हे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट सहभागी नसतात. ते देशपातळीचे नेते आहेत,” असे नमूद करत सुप्रिया सुळे यांनी पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबतही स्पष्टता आणली. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर आणि सुळेंच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना नवे वळण मिळाल्याचे दिसत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *