जळगाव : प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती निश्चित केली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी चर्चा अद्याप सुरू असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सध्या ही युती ‘महायुती’ नसून केवळ दोन पक्षांची आघाडी आहे.

भाजपातर्फे इच्छुकांची बैठक पार पडल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण व प्रमुख आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. महाजन म्हणाले की, शिवसेनेसोबत जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण झाली असून काही जागांवर तडजोडही झाली आहे. भाजप किमान ५० जागांवर उमेदवार देणार असून त्यापेक्षा कमी जागा स्वीकारल्या जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत अद्याप जागावाटपावर चर्चा झालेली नाही. ती निश्चित झाल्यावरच ‘महायुती’ची अधिकृत घोषणा केली जाईल. यासाठी उद्या (२८ डिसेंबर) बैठक बोलावण्यात येणार आहे.
६४ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास
२०१८ च्या निवडणुकीत भाजपने ७५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली जाणार असून विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे या वेळी ६४ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा ठाम विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.



