Home » महाराष्ट्र » अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जळगावात राजकीय शक्तीप्रदर्शन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जळगावात राजकीय शक्तीप्रदर्शन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जळगाव : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, दि. ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने जळगाव महापालिका परिसरात दिवसभर प्रचंड गडबड पाहायला मिळाली. सकाळी ९ वाजेपासूनच सर्वच राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी समर्थकांसह महापालिकेत दाखल झाले होते. अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

निवडणूक प्रक्रियेला सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महापालिका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होती. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना रांगा लावाव्या लागत होत्या. प्रत्येक उमेदवारासोबत केवळ सूचक व अनुमोदक अशा तिघांनाच मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येत होता. एकावेळी एकाच उमेदवाराला प्रवेश दिला जात असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून त्यानंतर कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नाही.

अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ जवळ येताच उमेदवारांची धावपळ सुरू झाली. समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याने परिसर दणाणून गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित राजकीय पक्षांचे पदाधिकारी एबी फॉर्मसह महापालिकेत दाखल झाले. उमेदवारांना एबी फॉर्म देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी महापालिका परिसरात ठाण मांडले होते. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *