एरंडोल : प्रतिनिधी
कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्रीकांत पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर अवैध कृत्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली असून त्यांच्या पथकाने आडगाव येथे तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत विशाल सुभाष महाजन (वय २२, रा. नागोबा मढी, ता. एरंडोल) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथे एक तरुण तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, नितीन सूर्यवंशी व योगेश पाटील यांच्या पथकाला संशयिताच्या शोधार्थ रवाना केले. मात्र, पोलिस येत असल्याची चाहूल लागताच संशयित पसार झाला होता.
दरम्यान, दि. २९ रोजी पोलिसांची नियमित गस्त सुरू असताना संशयित विशाल महाजन हा पुन्हा गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने तपासचक्रे फिरवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तलवार ही त्याचे पाहुणे योगेश गुलाब महाजन यांच्या घरी कोणीही नसताना लाकडी खाटेत (कॉटमध्ये) लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित ठिकाणाहून तलवार पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



