Home » महाराष्ट्र » जळगाव मनपात महायुतीचा आत्मविश्वास दुणावला; शिंदे गटाचा पहिला विजय

जळगाव मनपात महायुतीचा आत्मविश्वास दुणावला; शिंदे गटाचा पहिला विजय

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेदरम्यान शहराच्या राजकारणात मोठे नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १८ (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी दाखल केलेले आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयामुळे जळगाव महापालिकेत शिंदे गटाने आपले खाते उघडले असून, महायुतीचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये याआधीच महायुतीचे उमेदवार मतदानाआधीच विजयी झाले आहेत. भाजपकडून कल्याण–डोंबिवली ३, धुळे २ आणि पनवेल १ अशा एकूण ६ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला असून, आता जळगावात शिवसेना (शिंदे गट) चा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १,०३८ उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत तब्बल १३५ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या अधिकृत ‘एबी’ फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा भाजप उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरलेला असल्याने त्या आता भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पक्षाचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी घराणेशाहीसाठी पक्षाची तत्त्वे बाजूला ठेवली, असा गंभीर आरोप पाटील यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. “निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला आहे.

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर जळगाव महानगरपालिकेसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) २३ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये उमेदवारांची ‘आयात-निर्यात’ झाल्याने नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करणे हे महायुतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *