जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दमदार सुरुवात करत बिनविरोध विजयांची मालिका सुरू ठेवली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांचीही बिनविरोध निवड झाली असून, त्यामुळे शिवसेनेचा दुसरा तर महायुतीचा तिसरा उमेदवार मतदानाआधीच विजयी ठरला आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. काल सायंकाळी भाजपच्या उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानंतर आज सकाळी प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची जागा बिनविरोध निवडून आली. यानंतर प्रभाग क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने चौधरी यांची निवड बिनविरोध झाली आहे.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महायुतीचे एकूण चार उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असे वक्तव्य केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मनोज सुरेश चौधरी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात याची विशेष चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे जळगाव महापालिकेत महायुतीने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.



