जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असून सायंकाळी साडेपाच वाजेपासून प्रचार तोफा थंडावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी सर्व प्रकारचा जाहीर प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज दिवसभर शहरभर सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांचा जोर पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुती, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रश्न, विकासकामांचे मुद्दे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार, महागाई आणि मूलभूत सुविधांवर भर देत आरोप-प्रत्यारोपांची राजकीय रणधुमाळी रंगली आहे.

निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष
जळगाव मनपा निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असून मतदानानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्येक पक्षाने विजयाचा दावा केला असून शेवटच्या क्षणापर्यंत प्रचारात कोणतीही कसर ठेवलेली नाही.
अपक्ष उमेदवारांची ताकद
यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी अनेक प्रभागांमध्ये मोठी ताकद दाखवली आहे. स्थानिक काम, वैयक्तिक संपर्क आणि नागरिकांशी थेट संवादाच्या जोरावर अपक्ष उमेदवारांनी मोठ्या पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार निकालावर निर्णायक प्रभाव टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रतिष्ठेची लढत
काही प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. मंत्री, आमदार, माजी आमदार, नगरसेवक आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते थेट प्रचारात उतरले असून त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय राजकारणावरही परिणाम करणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive



