जळगाव : प्रतिनिधी
लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी १ लाख ७० हजार रुपये घेऊन दोन तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच कुटुंबातील दोन बहिणींचे लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८, रा. सितासोनू नगर) व त्याचा मित्र गणेश नथ्थू काथार यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. मात्र लग्नानंतर माहेरी गेलेल्या दोन्ही नववधू परत न आल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी लग्न जुळवून देणाऱ्या महिलेसह नववधू व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सितासोनू नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मण भदाणे यांच्या लग्नासाठी कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. यावेळी त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या मनिषा संजय जैन हिने पालघर येथील स्थळ आणले. लग्नासाठी मुलीच्या कुटुंबाला १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी मनिषा जैन हिने कविता कन्हैयालाल पटेल हिच्यासह तिचे आई-वडील, बहिण सविता, पुनम वर्मा नावाची आत्या व राणी ताई किन्नर यांना घेऊन भदाणे यांच्या घरी हजेरी लावली. मुलगी पसंत पडताच त्याच दिवशी नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह लावून देण्यात आला. यावेळी मनिषा जैन व राणी ताई यांच्या माध्यमातून पैसे देण्यात आले.
लग्नानंतर काही दिवसांत कविताच्या आई-वडिलांनी तिला पालघरला नेत ‘दोन-चार दिवसांत मुलगी परत पाठवतो’ असे सांगितले. मात्र ती परत आली नाही. त्यानंतर ३ जानेवारी रोजी लक्ष्मण भदाणे हा मित्र गणेश काथार व त्याची पत्नी सविता यांच्यासह पालघर येथे गेला. तेथे कविताच्या वडिलांनी विनाकारण वाद घालत गणेशची पत्नी सविता हिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांना गुजरातमधील वाघाबारी फडवेल रोड येथील एका शेतात नेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघे जळगावला परतले. त्यांनी ही बाब मनिषा जैन हिला कळवली असता तिने ‘आठ दिवसांत मुलगी परत येईल’ असे सांगितले. मात्र आजपर्यंत दोन्ही नववधू परत न आल्याने अखेर तालुका पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीवरून संशयित मनिषा संजय जैन (रा. राजाराम नगर समोर), नववधू कविता कन्हैयालाल पटेल, सविता कन्हैयालाल पटेल, त्यांचे कथित आई-वडील तसेच राणी ताई (सर्व रा. चाळ, काटकर पाडा, गणेश नगर, शिगाव, पालघर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लक्ष्मण भदाणे यांचा मित्र गणेश काथार हेदेखील लग्नासाठी मुलगी शोधत असल्याने त्याचे भदाणे यांच्या पत्नीची बहिण सविता पटेल हिच्याशी लग्न ठरले होते. त्यासाठीही १ लाख ७० हजार रुपये देण्यात आले. २६ डिसेंबर रोजी त्याचा विवाह लावून देण्यात आला होता. मात्र या लग्नातही फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.



