Home » जळगाव » ज्वेलर्समध्ये हातचालाखी; सीसीटीव्हीत कैद झालेली सोन्याची चोरी

ज्वेलर्समध्ये हातचालाखी; सीसीटीव्हीत कैद झालेली सोन्याची चोरी

जळगाव : प्रतिनिधी

सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने शोरूममध्ये आलेल्या एका संशयिताने हातचालाखी करत २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अ‍ॅण्ड सन्स) या सुवर्ण पेढीत घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स येथे गणेश काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ९ जानेवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे स्टॉक तपासणी करत असताना चैन काऊंटरवरील १९.३५० ग्रॅम वजनाची २२ कॅरेट सोन्याची चैन कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी संबंधित काऊंटरवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास एक अनोळखी पुरुष ग्राहकाच्या वेशात काऊंटरवर आलेला दिसून आला.

फुटेजनुसार, सेल्समनने संशयितास सोन्याच्या पाच चैन दाखविल्या होत्या. त्यापैकी एक चैन त्याने हातात घेतली व त्या चैनीवरील प्लास्टिक रॅपर खाली टाकून दिला. त्यानंतर तो फ्लोअर मॅनेजर भूषण जैन यांच्याशी काही वेळ बोलला आणि शोरूममधून निघून गेला. मात्र नंतर स्टॉक तपासणीदरम्यान एक चैन कमी असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत व्यवस्थापकांनी संबंधित सेल्समनकडे चौकशी केली असता दिवसभरात पाच ग्राहक चैन खरेदीसाठी आले होते. त्यापैकी चार जणांनी चैन खरेदी केली, तर एक जण ‘चैन पसंत नसल्याचे’ सांगून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

व्यवस्थापक गणेश काळे यांनी सीसीटीव्ही फुटेजसह शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून १९ जानेवारी रोजी अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रीराम बोरसे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *