मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय कमोडिटी बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली असून सोन्या-चांदीच्या किमतींनी नवे उच्चांक गाठले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी उसळी घेत आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला, तर चांदीच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिका-युरोपमधील संभाव्य व्यापार युद्ध, डॉलरची कमजोरी आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातूंना पसंती दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एमसीएक्सवर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायर होणाऱ्या सोन्याच्या वायदे व्यवहारात प्रति १० ग्रॅम १,५८,२५० रुपयांपर्यंत दर पोहोचले. बुधवारी सकाळी १०:३० वाजता हे सोने १,५७,७५० रुपयांवर व्यवहार करत होते. मागील ट्रेडिंग सत्रात सोने १,५०,५६५ रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किमतीत सुमारे ७,१८५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने १,५८,३३९ रुपयांचा उच्चांकही गाठला.
चांदीच्या किमतींनीही तेजीचा वेग पकडला आहे. एमसीएक्सवर ५ मार्च २०२६ रोजी एक्सपायर होणारी चांदी प्रति किलो ३,३२,१४२ रुपयांवर व्यवहार करत होती. ही किंमत मागील दिवसाच्या बंद भावापेक्षा सुमारे ८,८५० रुपयांनी जास्त आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये चांदी ३,३४,०२७ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती.
दरम्यान, अमेरिका आणि युरोपमधील वाढता तणाव गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून आठ युरोपीय देशांवर १० टक्के आयात कर लावण्याची घोषणा केल्याने व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. युरोपियन संसद अमेरिकन व्यापार कराराच्या मंजुरी प्रक्रियेला स्थगिती देण्याचा विचार करत असल्याचे संकेतही मिळत आहेत.
या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून सुरक्षित पर्यायांकडे मोर्चा वळवला असून, त्याचा थेट फायदा सोने आणि चांदीला होत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. आगामी काळातही जागतिक घडामोडींवर अवलंबून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



