वर्धा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील आर्वी शहरात बुधवारी सकाळी एका माथेफिरू युवकाच्या उच्छादामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. शहरातील गजबजलेल्या इंदिरा भाजी मार्केट परिसरात २२ वर्षीय माथेफिरू युवकाने लाकडी काठीने केलेल्या अमानुष मारहाणीत एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मथुरेश उर्फ मत्या लाडके (वय २२, रा. आर्वी) असे आरोपीचे नाव असून तो बुधवारी सकाळी नग्नावस्थेत हातात मोठी लाकडी काठी घेऊन इंदिरा भाजी मार्केटमध्ये घुसला. बाजारात भाजीपाला व शेतमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी आपल्या कामात व्यस्त असतानाच त्याने अचानक हल्ला चढवला. आरोपीने संजय रामकृष्ण राऊत (वय ७०) या वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यावर लाकडी काठीने जोरदार प्रहार केले. या प्रहारात राऊत यांची कवटी फुटून गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राऊत हे शेतमाल विक्रीसाठी बाजारात आले होते.
यानंतर माथेफिरू युवकाने तेथेच उपस्थित असलेले रामराव महादेवराव वांगे (वय ८५) आणि शहजाद यांच्यावरही काठीने बेछूट मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. भरबाजारात सुरू असलेल्या या थरारामुळे विक्रेते व ग्राहकांमध्ये एकच पळापळ उडाली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही धाडसी नागरिकांनी माथेफिरू मथुरेशला घेराव घालून पकडले. माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी रामराव वांगे व शहजाद यांना प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे आर्वी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरबाजारात घडलेल्या या अमानुष घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



