छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत अस्वस्थता उघड होत असून, संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, राजेंद्र राठोड यांच्या कन्या मोनाली राठोड यांना आमखेडा जिल्हा परिषद गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही उमेदवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजेंद्र राठोड हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याच दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला अवघ्या एका आठवड्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. दत्ता गोर्डे यांनी यापूर्वी ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांनाही पराभव पत्करावा लागला. या सलग अपयशानंतर दत्ता गोर्डे यांनी ठाकरे गटापासून फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका निवडणुकांतील पराभव, नेत्यांची गळती आणि अंतर्गत अस्वस्थता यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढताना दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या घडामोडींचा थेट परिणाम होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.



