जळगाव : प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायीक खुबचंद साहित्या यांच्या डोळ्यात स्प्रे मारुन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ७ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेणाऱ्या निखील प्रताप सुर्यवंशी (वय २३, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, ह. मु. गणेश कॉलनी) व दीपक प्रकाश बाविस्कर (वय २३, रा. शिवाजी नगर हुडको) या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्या दोघांना दि. २३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सविस्तर वृत्त असे कि, मॉर्निंग वॉक करुन घराकडे पतरणारे बांधकाम व्यावसायीक खुबचंद साहित्या यांच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्यांनी डोळ्यात स्प्रे मारला. त्यानंतर मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सात तोळे सोन्याची चैन जबरीने हिसकावून नेल्याची घटना दि. ८ जानेवारी रोजी सकाळी पावणेदहा वाजता नयनतारा गेस्ट हाऊस समोर घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपनिरीक्षक राहूल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, विशाल कोळी, राहूल घेटे, निलेश पाटील या पथकाकडून या पथकाकडून कसून शोध घेतला जात होता. पथकाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी त्यांना मारहाण केल्याचे कैद झाले होते.
संशयित प्रताप सुर्यवंशी याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा त्याचा मित्र दीपक बाविस्कर याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार संशयित बाविस्कर याला देखील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



