जळगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर, उपगटनेतेपदी नितीन बरडे व प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली.

येथे या निवडीनंतर नाशिक विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. महापालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे ४६ नगरसेवक निवडून आले असून महापालिकेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या गटनेते पदाच्या निवडीची धावपळ आता सुरू झाली आहे. गुरूवारी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीकडे राजकीय मंडळीसह जळगावकरांचे लक्ष लागून आहे.
गट नोंदणीसाठी भाजपाचे सर्व नगरसेवक बुधवारी नाशिकला रवाना झाले होते. याठिकाणी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत प्रकाश बालाणी यांच्या नावावर एकमत झाल्याने महापालिकेच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली. तसेच उपगटनेतेपदी महापालिकेतील अनुभवी असलेले नगरसेवक नितीन बरडे यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपाचे प्रभाग 9 चे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. युवा नगरसेवकाला प्रतोपदासारखी मोठी जबाबदारी देऊन भाजपाने धक्कातंत्राचा वापर केला आहे.



