Home » जळगाव » बहिणाबाई महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन; लोककला, संस्कृती व पुरस्कार सोहळ्याने जळगावात उत्साह

बहिणाबाई महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन; लोककला, संस्कृती व पुरस्कार सोहळ्याने जळगावात उत्साह

जळगाव : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिणाबाई महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी उत्साहात झाला. महोत्सवस्थळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले.

या पाच दिवसीय महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांची भारत माता की आरती, ह. भ. प. रविकिरण महाराज यांचे किर्तन, देशभक्तीपर गीते, वहिगायन, भावगीते, मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शालेय व महाविद्यालयीन कलाकारांना कला सादरीकरणाची संधी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थ तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्सही महोत्सवस्थळी उभारण्यात आले असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या ११व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनिष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, डॉ. पी. आर. चौधरी, शैलेश मोरखडे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, दीपक जोशी, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, पवन जैन, सागर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन विनोद ढगे व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले, तर प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी मांडले. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी आपल्या कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

उद्यापासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याच कार्यक्रमात उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुखराज पगारीया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *