जळगाव : प्रतिनिधी
पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याच्या माहितीदरम्यान मोबाईलवर आलेली संशयास्पद लिंक चुकून क्लिक झाल्याने अमळनेर येथील ७९ वर्षीय निवृत्त शिक्षकाची तब्बल ७ लाख ८९ हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली. तर फ्रेन्चाईसी मिळवून देतो, असे आमिष दाखवून खासगी वाहन चालकाकडून ५ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १३ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथून निवृत्त झालेले शिक्षक माधवदास खिल्लुमल शुगानी (वय ७९, रा. अमळनेर) यांनी ५ सप्टेंबर रोजी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याबाबत ऑनलाईन माहिती शोधली होती. रात्री उशिरा झोप येत असताना मोबाईलवर आलेली लिंक त्यांच्या हातून चुकून क्लिक झाली. नंतर ती लिंक त्यांनी डिलीट केली. प्रकृती अस्वस्थ असल्याने दोन दिवस मोबाईल वापरला नाही. १५ सप्टेंबर रोजी बँक खाते तपासले असता त्यातून ७ लाख ८९ हजार ९९२ रुपये परस्पर काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. बँकेत चौकशी केल्यानंतर ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी २३ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, मेहरुण परिसरातील खासगी वाहन चालक शेख शरीफ शेख खलील (वय ३१) यांना फ्रेन्चाईसी मिळवून देतो, असे सांगत वेळोवेळी ५ लाख ३७ हजार रुपये ऑनलाईन घेण्यात आले. मात्र फ्रेन्चाईसी मिळाली नाही तसेच दिलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.



