मुंबई : वृत्तसंस्था
ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील कोळमाथा येथे नंदलाल लॉन्ससमोर स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. २७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.

वरद एकनाथ तांबे (रा. ओतूर) आणि करण पवळे (रा. पिरंगुट) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर अभिनव गणेश वाकचौरे व ओंकार गोरक्ष शिंदे (रा. साकूर मांडवे) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाला पुरेशी झोप न मिळाल्याने डुलकी लागून वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे चारही तरुण सोज्वळ, मेहनती व कामकाजी असल्याने ओतूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस अधिक तपास करत आहेत.



