Home » राष्ट्रीय » जिल्हा परिषद निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण, भाजपवर गंभीर आरोप !

जिल्हा परिषद निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण, भाजपवर गंभीर आरोप !

लातूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत धक्कादायक घटना घडली असून, काँग्रेसच्या एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच ही घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

अपहरण झालेल्या महिला उमेदवाराचे नाव अंजना सुनील चौधरी असे असून त्या निलंगा तालुक्यातील औसा विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अंजना चौधरी यांचे २४ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता उदगीर येथून अपहरण झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरात आपल्या मैत्रिणीकडे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या थेट प्रचारासाठी जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे तेथे उपस्थित होते. मात्र, कोकणे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना काही अज्ञात गुंडांनी अंजना चौधरी यांना जबरदस्तीने एका वाहनात टाकून पळवून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, “सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराच्या गुंडांनी हे अपहरण केले असून, निवडणुकीतून उमेदवाराला बाजूला करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे,” असा गंभीर आरोप केला.

या प्रकरणी काँग्रेसने जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. अंजना चौधरी यांचा तातडीने शोध घेऊन त्यांची सुरक्षित सुटका करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या अपहरणाच्या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *