Home » राष्ट्रीय » बारामती विमानतळावर थरार : लँडिंगवेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात

बारामती विमानतळावर थरार : लँडिंगवेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात

पुणे : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष छोट्या विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाचा ताबा सुटल्याने हे विमान धावपट्टीजवळील एका शेतात कोसळले.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक व पीए उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, सर्वजण गंभीर जखमी झाले असून प्रशासनाकडून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजित सभांच्या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते विमानतळ आणि रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. दरम्यान, पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य कोणते कारण, याचा तपास सुरू असून नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *