बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रासह कला विश्वातील मान्यवरांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रचंड जनसागरामुळे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना अंत्यदर्शनासाठी आत प्रवेश मिळू शकला नाही. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देता न आल्याने आनंद शिंदे अत्यंत भावुक झाले.

यावेळी आपली भावना व्यक्त करताना आनंद शिंदे म्हणाले, “ज्या दादांसोबत मी अनेक वर्षे उठलो-बसलो, आज त्यांच्याच दर्शनासाठी आत जाता आलं नाही. कोणाचं काही काम असलं की मी थेट दादांना फोन करायचो आणि ते हक्काने म्हणायचे, ‘शिंदेंना आत घेऊन या.’ पण आता असा फोन करून मला आत बोलावून घेणारा दादाच राहिला नाही.” असे म्हणत त्यांनी एका जवळच्या मित्राला आणि खंबीर पाठीराख्याला गमावल्याची खंत व्यक्त केली.
गर्दीमुळे अंत्यदर्शन होऊ न शकल्याने निराश झालेल्या आनंद शिंदे यांनी हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली आणि अत्यंत जड अंतःकरणाने तेथून निघून जाणे पसंत केले. “आता काहीच सुचत नाही. इतक्या जवळ येऊनही दादांचे दर्शन घेता आले नाही, ही फार मोठी खेदाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत, समर्थक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या साक्षीने अजित दादा पंचतत्त्वात विलीन झाले. संपूर्ण बारामती शहर भावूक वातावरणात बुडाले होते.
धडाडीचे नेतृत्व, रोखठोक शैली आणि विकासकामांचा वेग यासाठी ओळखले जाणारे अजित पवार आता कायमचे हरपल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. सभेच्या व्यासपीठावर किंवा पत्रकार परिषदेत पुन्हा कधीही ऐकू न येणारा दादांचा मिश्किल आणि ठाम आवाज आठवून कार्यकर्ते आणि चाहते अश्रूंनी भरून आले. आपल्या हक्काच्या माणसाला अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकालाच भावना आवरता येत नव्हत्या.



