Home » राष्ट्रीय » रेकॉर्डनंतर क्रॅश; सोने ३३ हजारांनी, चांदी लाखभर स्वस्त

रेकॉर्डनंतर क्रॅश; सोने ३३ हजारांनी, चांदी लाखभर स्वस्त

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. प्रती १० तोळे सोन्याच्या दरात एका झटक्यात ३३ हजार रुपयांहून अधिक घट झाली आहे.

ही घसरण केवळ वायदे बाजारापुरती मर्यादित न राहता स्थानिक सराफ बाजारातही स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने दोन लाखांच्या आसपास जाईल, तर चांदी चार लाखांचा टप्पा ओलांडल्याने बाजारात मोठी चर्चा सुरू होती. मात्र, दराने उच्चांक गाठल्यानंतर मोठी घसरण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात होती, ती आता प्रत्यक्षात आली आहे.

जाणकारांच्या मते चांदीच्या दरात तयार झालेला फुगा फुटणे अटळ होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठत प्रती किलो ४ लाख २० हजार ४८ रुपयांचा स्तर गाठला होता. याआधी चांदीचा दर ३ लाख ९९ हजार ८९३ रुपयांपर्यंत पोहोचला होता.

मात्र, शुक्रवारी वायदा बाजार बंद झाल्यानंतर ५ मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीच्या दरात जोरदार घसरण झाली. वेगाने खाली येत हा दर प्रती किलो २ लाख ९१ हजार ९२२ रुपयांपर्यंत घसरला. यामुळे अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात प्रती किलो १ लाख ०७ हजार ९७१ रुपयांची घसरण नोंदवली गेली. उच्चांकावरून पाहता चांदी जवळपास १ लाख २८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरालाही मोठा फटका बसला आहे. एमसीएक्सवर २ एप्रिल एक्सपायरी असलेल्या २४ कॅरेट सोन्याचे वायदे भाव गुरुवारी प्रती १० ग्रॅम १ लाख ८३ हजार ९६२ रुपये होते. मात्र शुक्रवारी हे दर घसरून प्रती १० ग्रॅम १ लाख ५० हजार ८४९ रुपयांपर्यंत खाली आले. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ३३ हजार ११३ रुपयांची घट झाली आहे. या अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला असून, येत्या काळात सोने-चांदीच्या दरात अधिक चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *