मुंबई : वृत्तसंस्था
तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून अपहृत बालिकेची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे मुंब्रा पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता मुंब्रा येथील खाडीमशीन रोडवर ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादी फरजाना मन्सुरी या आपल्या दोन मुलींना घेऊन रस्ता ओलांडत असताना एका अनोळखी महिलेने ‘मदत करण्याच्या’ बहाण्याने त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला आफिया कडेवर घेतले. गर्दीचा फायदा घेत त्या महिलेने बाळासह पळ काढला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले की, आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुंब्रा ते ठाणे प्रवासादरम्यान अनेकदा आपले कपडे, नकाब तसेच बाळाचे पांघरूण बदलले होते. रिक्षाचालकाचा माग काढत आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथम नसरीन इकलाख शेख या महिलेला ताब्यात घेतले. लहान मुलांच्या अपहरण प्रकरणात वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो. उशीर झाल्यास बाळ मानवी तस्करीच्या जाळ्यात जाण्याची शक्यता वाढते. हे ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाल केली. आरोपींनी रेल्वे स्थानकांवरील छुपे मार्ग आणि वारंवार वेशांतर करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून न राहता बाळाच्या पायातील सॉक्ससारख्या सूक्ष्म खुणांवरूनही तपास पुढे नेला. सलग ६ दिवस दररोज १६ ते १८ तास काम करून, १६०० हून अधिक कॅमेऱ्यांचे विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि अकोल्यापर्यंतचा वेगवान पाठलाग करत अखेर चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलिसांच्या चिकाटीचे, समन्वयाचे आणि आधुनिक कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.



